भाषेचे अलंकार : शब्दालंकार / अर्थालंकार – मराठी व्याकरण

0
101

◆ भाषेचे अलंकार : शब्दालंकार / अर्थालंकार – मराठी व्याकरण

● भाषेचे अलंकार :-भाषेला ज्याच्या-ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.

• कधी दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर कधी विरोध दाखवून, कधी नाद निर्माण करणारे शब्द वापरून,तर कधी एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. कधी शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते, तर कधी योजिलेल्या शब्दांमुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते.

● भाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार होतात

  • (१) शब्दालंकार
  • (२) अर्थालंकार.

यातील काही अलंकारांची ओळख क्रमाने करून घेऊ.

शब्दालंकार

(१) अनुप्रास – पुढील कवितेच्या ओळी वाचा.

१) गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.
२) रजतनील, ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.
• वरील ओळी वाचताना ‘ल’ हे अक्षर पुनःपुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या
काव्यपंक्तीला शोभा आली आहे. अशा रीतीने एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.

(२) यमक – खालील चरण वाचा.

(१) जाणावा तो ज्ञानी । पूर्ण समाधानी । निःसंदेह मनी । सर्वकाळ ।।
यातील पहिल्या तीन चरणांच्या शेवटी ‘नी’ हे अक्षर आलेले आहे. तसेच
(२) राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी ।
फळा आली माय । मायेची पाठवणी ।।
• यातील दुसऱ्या व चवथ्या चरणांच्या शेवटी आठवणी’ ही चार अक्षरे क्रमाने आल्यामुळे ऐकताना
गंमत वाटते. अशा प्रकारे, कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा अलंकार होतो.

(३) श्लेष – पुढील वाक्ये वाचा.

गोंविदराव : काय वसंतराव, तुम्हांला सुपारी लागते का?
वसंतराव : हो, हो लागते ना!
गोविंदराव : जर लागते. तर का खाता? •या संवादात’लागते’ या शब्दाच्या दोन अर्थानी दोघेही बोलत असल्यामुळे थोडी गमंत घडते.

‘लागणे’ या शब्दाचे दोन अर्थ होतात १) हवी असणे २) खाल्ल्याने भोवळ किंवा चक्कर येणे

• अशा रीतीने एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती साधते, तेव्हा
श्लेष हा अलंकार होतो. ‘श्लिष्’ या शब्दाचा अर्थ आलिंगणे, एकमेकांत मिसळणे, असा आहे. (ग्लेष
आलिंगन-मिठी) एकाच शब्दाला दोन अर्थांची मिठी बसलेली असते म्हणजे दोन अर्थ चिकटलेले असतात.
त्यामुळे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात.

◆ अर्थालंकार

अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द किंवा अलंकारात येणारे घटक पुढीलप्रमाणे (अर्थात है
सर्वच अलंकारात असतात असे नव्हे)
(१) उपमेय – ज्याची तुलना करावयाची आहे, ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे, तो घटक
(२) उपमान – ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते, तो घटक,
(३) साधारण धर्म – दोन वस्तूंत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूंत असणारा समान गुणधर्म,
(४) साम्यवाचक शब्द – वरील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द.

• वरील घटकांचा अर्थ समजून घेण्यासाठी वरीलपैकी एक वाक्य उदाहरण म्हणून घेऊ.
उदा : ‘सुरेशचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहे.’
वरीत वाक्यात सुरेशचे अक्षर हे उपमेय आहे.
सुरेशच्या अक्षराची तुलना ‘मोत्याशी’ केली आहे. ‘मोती‘ हे उपमान आहे.

(१) उपमा – पुढील वाक्ये वाचा.
(१) मुंबईची ‘घरे’ मात्र लहान! कबुतराच्या खुराड्यांसारखी
(२) सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी!
(३) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे!
वरील वाक्यांतून दोन वस्तूंतील सारखेपणा कसा सुंदर रीतीने वर्णिलेला आहे पाहा. अशा प्रकारे दोन
वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते, तिथे ‘उपमा’ हा अलंकार होतो. उपमेत एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते.

(२) उत्प्रेक्षाउत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यांतील एक (उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तूच (उपमानच) आहे, अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा म्हणतात.

पुढील वाक्ये वाचा.
(१) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.
(२) अत्रीच्या आश्रमी । नेलें मज वाटें । माहेरची वाटें । खरेखुरें ।
(३) किती माझा कोंबडा मजेदार । मान त्याची कितीतरी बाकदार
शिरोभागी तांबडा तुरा हाले । जणू जास्वंदी फूल उमललेले ।।
अर्धपायी पांढरीशी विजार । गमे विहगांतिल बडा फौजदार ।।

• कोंबड्याचा तुरा हे कवीला जणू उमललेले जास्वंदीचे फूल वाटले किंवा पांढऱ्या, अर्ध्या विजारीमुळे तो पक्षातला या बडा फौजदार भासला, ही कल्पना म्हणजेच उत्प्रेक्षा.

(३) अपन्हुती – पुढील काव्यपंक्ती वाचा.
न हे नयन, पाकळ्या उमलत्या सरोजातिल ।
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ।।

● पहिल्या ओळीत कवीला डोळ्यांचे वर्णन करावयाचे आहे. हे करताना त्यांची तुलना तो कमळाच्या पाकळ्यांशी करतो. या वाक्यांत ‘नयन’ हे उपमेय आहे. ‘कमळातल्या पाकळ्या’ हे उपमान. इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत, असे सांगताना त्याने उपमेयाला दूर सारून म्हणजे उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे, असे जेव्हा सांगते, तेव्हा ‘अपन्हुती’ हा अलंकार होतो.

(४) रूपक – पुढील पद्यपंक्ती किंवा वाक्ये पाहा.
(१) बाई काय सांगो । स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी । मज होय ।।
(२) ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ।।
(३) लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते.
• यातील पहिल्या उदाहरणात स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी ही दोन्ही एकरूपच मानली आहेत. दुसऱ्या वाक्यातील उपमेय (मुख) व उपमान (चंद्र) ही एकरूप मानून ‘मुखचंद्रमा’ असा शब्दप्रयोग केला आहे. तिसऱ्या वाक्यात लहान मूल हे मातीच्या गोळ्यासारखे आहे, असे नुसते उपमेय व उपमान यांतील केवळ सादृश्य न दाखविता त्यांच्यातील अभेद वर्णिलेला आहे. अशा प्रकारे उपमेय व उपमान यांत एकरूपता आहे.ती भिन्न नाहीत. असे वर्णन जिथे असते, तिथे रूपक हा अलंकार असतो.

(५) व्यतिरेक – त्याहीपुढे जाऊन उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षाही सरस असल्याचे
वर्णन केले जाते. पुढील वाक्य पाहा.
अमृताहुनी गोड । नाम तुझे देवा ।।

उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल, तर ‘व्यतिरेक’ हा अलंकार होतो. हे आधिक्य दोन प्रकारांनी दाखविता येते.
(१) उपमेयाच्या उत्कर्षाने व (२) उपमानाच्या अपकर्षाने.

(६) अनन्वय : आतापर्यंत एखाद्या वस्तूची दुसऱ्याशी तुलना करून आपण वर्णन करीत होतो, पण
उपमेय हे कधी-कधी एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की, त्याला योग्य असे उपमान मिळू
शकत नाही. उपमेयाची तुलना त्याच्याशी करावी लागते म्हणजे अशा वाक्यात उपमेय हेच उपमान असते.
उदा. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात.
झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा
अशा रीतीने उपमेयाला दुसन्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला (संबंध) ज्या वाक्यात तुलना उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा ‘अनन्वय’ अलंकार होतो.

भाषेचे अलंकार : शब्दालंकार / अर्थालंकार – मराठी व्याकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here