समास : समासाचे प्रकार

0
86

समास : समासाचे प्रकार

● भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. दोन किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. उदा. ‘चंद्राचा उदय’ असे न म्हणता आपण ‘चंद्रोदय’ असे म्हणतो.’पोळीसाठी पाट’ असे न म्हणता आपण ‘पोळपाट’ असे म्हणतो. ‘बटाटे घालून तयार केलेला वडा’ असे न म्हणता आपण ‘बटाटेवडा’ असे म्हणतो.शब्दांच्या अशा एकत्रीकरणास समास असे म्हणतात. ‘सम्+अस्’ या संस्कृत धातूपासून ‘समास’ हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ ‘एकत्र करणे’ असा आहे. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्परसंबंध दाखविताना त्यातील विभक्तीप्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. समास हीदेखील
भाषेतील काटकसर आहे.

● शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. हा
सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करून सांगतो.
फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दांत सामासिक
शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय. उदा. ‘वनभोजन’ हा सामासिक शब्द असून ‘वनातील भोजन’ हा त्याचा
विग्रह होय.

◆ समासाचे प्रकार

समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात अधिक महत्त्व, म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपल्याला अधिक बोलावयाचे असते, यावरून समासाचे प्रकार ठरविण्यात आलेले आहेत; ते असे.

(१) पहिले पद प्रमुख असेल, तर अव्ययीभाव समास.
(२) दुसरे पद प्रमुख असेल, तर तत्पुरुष समास.
(३) दोन्ही पदे महत्त्वाची असतील, तर द्वंद्व समास.
(४) दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल, तर बहुव्रीही समास.

अव्ययीभाव समास

जेव्हा समासातील पहिले पद बहुधा महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा अव्ययीभाव समास होतो.

उदा. • आजन्म – जन्मापासून • यथाशक्ती – शक्तीप्रमाणे
• प्रतिदिन – प्रत्येक दिवशी • प्रतिक्षण – प्रत्येक क्षणाला
● वरील उदाहरणांत आ. यथा, प्रति’ हे संस्कृतमधील उपसर्ग आहेत. संस्कृतमध्ये उपसर्गांना अव्ययेच
मानतात. हे उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले वरील शब्द हे सामासिक शब्द आहेत. त्यांचा वर दिल्याप्रमाणे
किह करताना या उपसर्गाच्या अर्थांना या सामासिक शब्दांत अधिक महत्त्व आहे, म्हणून या समासाला
प्रथमपदप्रधान समास असे म्हणतात. शिवाय एकूण सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय आहे; म्हणून
त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.

अ) संस्कृतप्रमाणे फारसी भाषेतील उपसर्ग प्रारंभी येऊन अव्ययीभाव समासाची मराठीत पुष्कळ उदाहरणे आहेत.
उदा. दररोज, हरहमेश, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त,
बरहुकूम, दरमजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर इत्यादी.
ब) मराठीत शब्दांची द्विरुक्ती होऊन बनलेले जोडशब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात.
उदा. गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस,
पावलोपावली इत्यादी.
● या शब्दांत संस्कृत किंवा फारसी अव्ययीभाव समासाप्रमाणे प्रारंभीचा शब्द अव्यय नाही. काही
शब्दांतील प्रथमपदाच्या अंती ‘ओ’ कार आलेला आहे. तरी एकंदरीत त्याचे स्वरूप क्रियाविशेषण अव्ययाचे
असल्यामुळे ही मराठीतील अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत.

तत्पुरुष समास

ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तीप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो.त्यास तत्पुरुष समास म्हणतात.

उदा. तोंडपाठ (तोंडाने पाठ), कंबरपट्टा (कंबरेसाठी पट्टा),
महादेव (महान असा देव), अनिष्ट (नाही इष्ट ते).
समासातील दोन्ही पदे कधी-कधी विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात.
उदा. काळमांजर (काळे असे मांजर) यास समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतात.
कधी-कधी दोन्ही पदे भिन्न अशा विभक्तीत असतात. जसे -देवपूजा (देवाची पूजा) या प्रकारास व्यधिकरण तत्पुरुष असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे प्रकार पाहू या.

(अ) विभक्ती-तत्पुरुष समास

● ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी
अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात. त्यास विभक्ती-तत्पुरुष समास असे म्हणतात. या
समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्तीप्रत्ययाने दाखविला जातो, त्याच विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते. या समासाचे पोटप्रकार पुढीलप्रमाणे.

(आ) अलुक् तत्पुरुष समास
पुढील सामासिक शब्द पाहा.
अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरूह, सरसिज या शब्दांच्या पहिल्या पदातील ‘अग्रे, युधि, पंके, कर्तरी, कर्मणी,
सरसि’ ही त्या-त्या शब्दांची संस्कृतमधील सप्तमीची रूपे न गाळता तशीच राहिली आहेत. (लुक् = लोप
होणे. अलुक् = लोप न होणारे) म्हणून ‘ज्या विभक्तीतत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुक् तत्पुरुष समास असे म्हणतात. ही सर्व उदाहरणे संस्कृत शब्दांची आहेत. ‘तोंडीलावणे
हे या समासाचे मराठी उदाहरण होय,
● (इ) उपपद तत्पुरुष समास
पुढील काव्यपंक्ती पाहा.
(१)शैवाले गुंतले तरि पंकज हे शोभते ।
(२) गडद निळे, गडद निळे, जलद भरुनि आले ।
वरील कवितेच्या ओळींतील पुढील शब्दांची फोड आपण कशी करतो ते पाहा.

(१) पंकज = पंकात (= चिखलात) जन्मणारे ते.
(२) जलद – जल देणारे.
● या समासातील दुसरे पद प्रधान आहे, म्हणून हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. शिवाय यांतील दुसरी
पदे धातुसाधिते किंवा कृदन्ते आहेत; व ही कृदन्ते अशी आहेत की, त्यांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही. अशा समासास उपपद किंवा कृदन्त तत्पुरुष समास असे म्हणतात. जसेग्रंथकार, कुंभकार, पांथस्थ, मार्गस्थ, द्विज, विहग, शेषशायी इत्यादी.
यांतील कार (करणारा), स्थ (राहणारा), ज (जन्मणारा), ग (जाणारा), शायी (निजणारा) ही त्या-त्या संस्कृत धातूपासून झालेली रूपे असून सामासिक शब्दांशिवाय त्यांचा अन्यत्र स्वतंत्रपणे उपयोग होत नाही. या समासाची आणखी काही उदाहरणे पाहा.

● पंकेरूह, सरसिज यांसारखे संस्कृत सामासिक शब्द व मळेकरी, पहारेकरी, पाखरेविक्या, गळेकापू
यांसारखे मराठी सामासिक शब्द हे अलुक् व उपपद तत्पुरुष अशा दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत. यातील पहिल्या पदातील विभक्तीचा लोप झाला नाही, म्हणून ते अलुक् व त्यांतील दुसरी पदे धातुसाधिते आहेत, म्हणून ते उपपद तत्पुरुष. अशा समासांना उभय-तत्पुरुष असेही म्हणतात.

● (ई) नञ् तत्पुरुष समास
पुढील वाक्ये पाहा.
(१) माझा निबंध अपुरा राहिला.
(२) अजामिळ हा नास्तिक होता.
● या वाक्यातील रंगीत शब्द लक्षपूर्वक पाहा. यातील दुसरी पदे महत्त्वाची आहेत. म्हणून ती तत्पुरुष
समासाची उदाहरणे आहेत. मात्र अशा पदातील पहिली पदे ‘अ, अन्, न, ना, बे, नि, गैर’ यांसारखी अभाव किंवा निषेध दर्शविणारी आहेत. अशा रीतीने ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते, त्यास नञ् तत्पुरुष समास असे म्हणतात. आणखी उदाहरणे पाहू.
अयोग्य (योग्य नव्हे ते), अनादर (आदर नसलेला), नापसंत (पसंत नसलेला).अनाचार, अन्याय, अहिंसा, निरोगी, नाइलाज, नाउमेद, बेडर, गैरहजर इत्यादी.
(उ) कर्मधारय समास
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा त्यास
कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा. महादेव (महान असा देव), घनश्याम (घनासारखा श्याम).
यातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते. यांतील दोन्ही पदांतील संबंध विशेषण-विशेष्य
किंवा उपमान-उपमेय अशा स्वरूपाचा असतो. उदा. रक्तचंदन (रक्तासारखे चंदन), मुखकमल (मुख हेच
कमल) इत्यादी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here