समास व समासाचे प्रकार – Samas in Marathi

Samas in Marathi Grammar : मराठी व्याकरण समास व त्याचे प्रकार, सर्व प्रथम बघूया समास म्हणजे काय व त्याचे विविध प्रकार म्हणजेच अव्ययीभाव तत्पुरुष व्दंव्द बहुव्रीही , त्यांचे Samas Examples in Marathi for 10th Class SSC.

भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. दोन किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. उदा. ‘चंद्राचा उदय’ असे न म्हणता आपण ‘चंद्रोदय’ असे म्हणतो.’पोळीसाठी पाट’ असे न म्हणता आपण ‘पोळपाट’ असे म्हणतो. ‘बटाटे घालून तयार केलेला वडा’ असे न म्हणता आपण ‘बटाटेवडा’ असे म्हणतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणास समास ( Samas in Marathi Vyakaran ) असे म्हणतात.

‘सम्+अस्’ या संस्कृत धातूपासून ‘समास’ हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ ‘एकत्र करणे’ असा आहे. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्परसंबंध दाखविताना त्यातील विभक्तीप्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. समास हीदेखील भाषेतील काटकसर आहे.

Samas in Marathi :

समास म्हणजे काय: जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा क जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास – Samas in Marathi असे म्हणतात. अशा रीतीनेतयार झालेल्या ह्या जोडशब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात.

समासाचे उदाहरण : Examples

 1. राजाचा वाडा-राजवाडा
 2. राम आणि लक्ष्मण-रामलक्ष्मण
 3. साखर घालून केलेला भात-साखर भात.

यातील राजवाडा, रामलक्ष्मण आणि साखरभात हे सामासीक शब्द आहेत.

या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना समासातील पदे असे म्हणतात.

समास कसा तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्यात जोडल्या जाणाऱ्या शब्दांना आवश्यक ते प्रत्यय लावून किंवा काही ठिकाणी अन्य शब्दांचे साहाय्य घेऊन त्याची फोड करावी लागते. ह्या फोड करण्याच्या पद्धतीला त्या समासाचा विग्रह Samas Vigrah करणे असे म्हणतात. समास हा एक मराठी व्याकरण चा महत्वाचा विषय आहे.

समास विग्रह उदाहरण :

 1. तोंडपाठ-तोडाने पाठ
 2. ऋणमुक्त-ऋणातून मुक्त
 3. प्रतिदिन-दर दिवशी
 4. सत्यासत्य-सत्य किंवा असत्य
 5. लंबोदर-लंब आहे उदर त्याचे तो.
 6. कृष्णार्जुन-कृष्ण आणि अर्जुन

समासाचे प्रकार – Types Of Samas

 1. अव्ययीभाव समास
 2. तत्पुरुष समास
 3. द्वंद्व समास
 4. बहुव्रीही समास

पहिले पद मुख्य, दुसरे पद मुख्य, दोन्ही पदे मुख्य, दोन्ही पदे गौण

१. अव्ययीभाव समास

Avyayibhav Samas in Marathi – अव्ययीभाव समास : यात पहिले पद प्रधान (महव्वाचे) असून असते किंवा अव्यय असते आणि संपूर्ण सामासिक शब्द हा बहुधा क्रियाविशेषण अव्यय असतो.

अव्ययीभाव समासाचे उदाहरण :

 1. अजन्म-जन्मापासून
 2. प्रतिवर्ष-दर वर्षाला
 3. आमरण-मरणापर्यंत
 4. घडोघडी-प्रत्येक घडीला
 5. गावोगाव-प्रत्येक गावी
 6. यथाशक्ती-शक्तीप्रमाणे.

इतर उदाहरणे : दरमजल, दररोज, हरहमेश, बिनशर्त, बेलाशक,बरहुकूम, गैरहजर, बरखास्त आसेतू, जागोजाग, घरोघर, पावलोपावली, बेमालूम, रात्रंदिवस, इत्यादी.

२. तत्पुरुष समास

Tatpurush samas in Marathi तत्पुरुष समास: ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.

ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.

उपप्रकार पुढीलप्रमाणे.

विभक्ती तत्पुरुष समास

समासाचा विग्रह करतांना गाळलेला विभक्तिप्रत्यय किंवा गाळलेले शब्द विग्रहामध्ये घालावे लागतात.

विभक्ती तत्पुरुष समास उदाहरणे .

 • कष्ट साध्या-कष्टाने साध्य (तृतीया तत्पुरुष समास)
 • शास्त्रसंपन्न-शास्त्रात संपन्न (सप्तमी तत्पुरुष समास)
 • देवपूजा जोडल्या देवाची पूजा (षष्ठी तत्पुरुष समास).


इतर उदाहरणे – भक्तिवश, गायरान, बाईलवेडा, पोळपाट, गर्भश्रीमंत, स्वर्गवास, पोटशूळ.

कर्मधारय समास :

हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार तयारअसून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते. त्यात क पद दुसऱ्या पदाचे विशेषण असते.

कर्मधारय समास उदाहरणे

 • महादेव-महा असा देव,
 • सुवासना- सु अशी वासना,
 • पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष,
 • घनश्याम-घनसारखा श्याम,

इतर उदाहरणे रक्तचंदन, नीलकमल, पीतांबर, लालभडक, मेघश्याम, नरसिंह, विद्याधन,काव्यामृत.

द्विगू समास

Dvigu Samas in Marathi : यात पहिले पद हे संख्यावाचक विशेषण  असून संपूर्ण सामाजिक शब्दाला समुदायवाचक अर्थ प्राप्त होतो. 

द्विगू समास उदाहरणे :

 • त्रिभुवन-तीन भुवनांचा समुदाय,
 • पंचपाळे-पाच पाळ्यांचा समुदाय,

इतर उदाहरणे – पंचवटी, चातुर्मास, नवरात्र, सप्ताह, पंचारती, त्रैलोक्य.

मध्यमपद लोपी समास

यात विग्रह करतांना दोन पदांतील संबंध दाखवणारे शब्द स्पष्ट लिहून दाखवावे लागतात.

मध्यमपद लोपी समास उदाहरणे.

 • बटाटेभात-बटाटे घालून केलेला भात,
 • वांगीपोहे- वांगी घालून केलेले पोहे,
 • पुरणपोळी-पुरण घालून केलेली पोळी,
 • लंगोटीमित्र-लंगोटी घालत असल्या वेळेपासूनचा मित्र.

नत्रतत्पुरुष समास:

यातील पहिले पद अ, अन् किंवा न असून त्यातून नकार किंवा निषेध व्यक्त होतो. दुसरे पद जर स्वरादी असेल तर पहिले पद अन् हे असते.

उदाहरणे:

 • अन् + आदर – अनादर = आदर नसलेला
 • न + गण्य = नगण्य = गण्य नसलेला

इतर उदाहरणे – अपुरा, नास्तीक, अयोग्य, निरोगी, नाइँलाज,बेडर, अहिंसा

उपपद तत्पुरुष :

या समासातील दुसरे पद हे धातूपासून तयार झालेले कृदन्ताचे रूप असते. म्हणजे एखाद्या धातूचा एखादा या शिल्लक राहिलेला अर्थपूर्ण शब्द किंवा अक्षर यात असते.

उदाहरणे

 • हर्षद-हर्ष देणारा,
 • नाटककार-नाटक लिहिणारा,
 • पंकज – पंकात जन्मलेले,
 • जलद-जल देणारा

इतर उदाहरणे : ग्रंथकार, कुंभकार, पांथस्थ, मार्गस्थ, द्विज,विहंग, शेषशायी, देशस्थ मनुज नृप, सुखद, पयोद, खग, नग, सुज्ञ,कृतघ्न, शेतकरी, लाचखाऊ, आगलाव्या, भाजीविक्या, वाटसरु.

अलुक तत्पुरुष समास ·

ज्या विभक्ती तत्पुरुषात पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्या समासाला ‘अलुक् तत्पुरुष समास’ म्हणतात.

अलुक तत्पुरुष समास उदाहरणे:

 • युधिष्ठिर अग्रेसर,
 • पंकेरूह,
 • कर्तरिप्रयोग,
 • कर्मणिप्रयोग,
 • सरसिज.

वरील शब्दाचा पहिला पदांतील अग्रे, युधि, पंके, कर्तरि,कर्मणि सरसि ही त्या त्या शब्दांची संस्कृतमधील सप्तमीची रूपे न गाळता तशीच राहिली आहेत.

तोंडी लावणे‘ हे अलुक्, तत्पुरुष या समासाचे मराठी उदाहरण आहे.

व्दंव्द समास :

ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द समास’  – Dwand Samas in Marathi असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

व्दंव्द समासाचे उदाहरणे :

 • रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
 • विटीदांडू – विटी आणि दांडू
 • पापपुण्य – पाप आणि पुण्य
 • बहीणभाऊ  – बहीण आणि भाऊ
 • आईवडील – आई आणि वडील
 • स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
 • कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
 •  ने-आण  – ने आणि आण
 • दक्षिणोत्तर – दक्षिण आणि उत्तर

व्दंव्द समासाचे खलील 3 प्रकार पडतात.

इतरेतर व्दंव्द समास

ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.

इतरेतर व्दंव्द उदाहरणे

 • आईबाप – आई आणि बाप
 • हरिहर – हरि आणि हर
 • स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
 • कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
 • पशुपक्षी – पशू आणि पक्षी
 • बहीणभाऊ – बहीण आणि भाऊ
 • डोंगरदर्यात – डोंगर आणि दर्यात

वैकल्पिक व्दंव्द समास

ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.

उदाहरणे

 • खरेखोटे – खरे आणि खोटे
 • तीनचार – तीन किंवा चार
 • बरेवाईट – बरे किंवा वाईट
 • पासनापास –  पास आणि नापास
 •  मागेपुढे – मागे अथवा पुढे
 • चुकभूल – चूक अथवा भूल
 • न्यायान्याय – न्याय अथवा अन्याय
 • पापपुण्य – पाप किंवा पुण्य
 • सत्यासत्य – सत्य किंवा असत्य

समाहार व्दंव्द समास

ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.

उदाहरणे

 • मिठभाकर –  मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी
 • चहापाणी –  चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ
 • भाजीपाला – भाजी, पाला, मिरची, कोथंबीर यासारख्या इतर वस्तु
 • अंथरूणपांघरून – अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणार्‍या वस्तु व इतर कपडे
 • शेतीवाडी – शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता
 • केरकचरा – केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
 • पानसुपारी – पान, सुपारी व इतर पदार्थ
 • नदीनाले – नदी, नाले, ओढे व इतर
 • जीवजंतू – जीव, जंतू व इतर किटक

बहुव्रीही समास :

Bahuvrihi Samas : ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरणे

 • नीलकंठ – ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
 • वक्रतुंड – ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
 • दशमुख  – ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)

बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.

विभक्ती बहुव्रीही समास

ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरणे.

 • प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
 • जितेंद्रिय – जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
 • जितशत्रू – जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
 • गतप्राण – गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती
 • पूर्णजल – पूर्ण आहेत जल ज्यात असे – सप्तमी विभक्ती
 • त्रिकोण – तीन आहेत कोन ज्याला तो – चतुर्थी विभक्ती

नत्र बहुव्रीही समास

ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.

उदाहरणे.  

 • अनंत – नाही अंत ज्याला तो
 • निर्धन – नाही धन ज्याकडे तो
 • नीरस – नाही रस ज्यात तो
 • अनिकेत – नाही निकेत ज्याला तो
 • अव्यय – नाही व्यय ज्याला तो
 • निरोगी – नाही रोग ज्याला तो
 • अनाथ – ज्याला नाथ नाही असा तो
 • अनियमित – नियमित नाही असे ते
 • अकर्मक – नाही कर्म ज्याला ते
 • अखंड – नाही खंड ज्या ते

सहबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.

उदाहरणे

 • सहपरिवार – परिवारासहित असा जो
 • सबल – बलासहित आहे असा जो
 • सवर्ण – वर्णासहित असा तो
 • सफल – फलाने सहित असे तो
 • सानंद – आनंदाने सहित असा जो

प्रादिबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरणे

 • सुमंगल – पवित्र आहे असे ते
 • सुनयना – सु-नयन असलेली स्त्री
 • दुर्गुण – वाईट गुण असलेली व्यक्ती
 • प्रबळ -अधिक बलवान असा तो
 • विख्यात – विशेष ख्याती असलेला
 • प्रज्ञावंत – बुद्धी असलेला.

तुम्ही वाचले आहे मराठी व्याकरणातील समास व समासाचे प्रकार, तुम्हाला आवडले असल्यास कंमेंट करून कळवा

33 thoughts on “समास व समासाचे प्रकार – Samas in Marathi”

 1. खूप छान माहिती आहे. यामुळे समास कळण्यास मदत झाली.

  Reply
 2. छान विश्लेषण केले आहे.काही ठिकाणी टायपिंगच्या चुका झाल्या आहेत.बाकी सर्व चांगले आहे.

  Reply
 3. खूप छान नोट्स आहेत, मला खुप मदत झाली परीक्षेसाठी…
  खूप खूप धन्यवाद…..!

  Reply
 4. पुन्हा शाळेत गेल्याचा आनंद मिळाला. शष्टी ततपुरुष समास असतो का?

  Reply
 5. मराठी भाषेच्या अभ्यासकांना आपण मोलाचे सहाय्य करत आहेत,त्याबद्दल अभिनंदन व आभार!

  Reply
 6. हो सर चांगल्या प्रकारे तुम्ही मांडलेत आहेत मला तर तर खूप चांगल्या प्रकारे समजजलं

  Reply

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा