Types of Tenses – काळाचे प्रकार – English Grammar

Types of Tenses – वाक्यांचे प्रकार | Present Tense, Past Tense, Future Tense – English Grammar

काळ व त्यांचे उपयोग – Tense in English Grammar

तुम्ही ऐकलं असेल की काळ तीन प्रकारचे असतात. पण काळ तीन प्रकारचे असतात ही माहिती ऐकूनच मिळते असं नाही. कोणालाही कळतं काळाचे प्रकार तीनच असणार. आणि तीनच प्रकार का तेही जास्त स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही – कारण आहेतच तीनतर चौथा प्रकार येणार कुठून? आहे की नाही?

काळाचे तीन प्रकार : Types Of Tenses in Grammar

१) Present Tense (वर्तमानकाळ)
२) Past Tense (भूतकाळ)
३) Future Tense (भविष्यकाळ)

आता मी तुम्हाला मराठीची दोन वाक्ये सांगणार आहे, त्या वाक्यांचा तुम्ही काळ ओळखायचा आहे. पण फक्त इतकंच ओळखायचं की वाक्य वर्तमानकाळाचं आहे की भूतकाळाचं की भविष्यकाळाचं. याच्या पलीकडेही काळ ओळखता येतो – चालू काळ, पूर्ण काळ…. हे शब्द तुम्ही ऐकलेलेच आहेत. पण सध्या फक्त वर्तमानकाळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ इतकंच तुम्ही सांगायचं.

वाक्ये पहा :

१) मी इंग्रजी शिकवतो.
२) मी इंग्रजी शिकवत आहे.
तुम्हाला या वाक्यांचा काळ ओळखायला उशीर लागला नाही – दोन्ही वाक्ये वर्तमानकाळाची आहेत. पण लक्षात इथे हे घ्यायचंय की दोन्ही वाक्यांतील क्रिया मात्र सारखी नाही. जसं दुसऱ्या क्रमांकाच्या वाक्यात क्रिया चालू आहे पण पहिल्या वाक्यात क्रिया चालू दिसत नाही. यावरून असं कळतं की एका काळात एकाच प्रकारची क्रिया असते अस नाही, तर
एकाच काळात वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया असू शकतात – आणि असतात. म्हणून या तीन मुख्य काळांचे उपप्रकार पडले आहेत. प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत.

या उपप्रकारांची नावे अशी
१) Simple Tense (साधा काळ)
२) Continuous Tense (चालू काळ)
३) Perfect Tense (पूर्ण काळ)
४) Perfect continuous Tense (पूर्ण चालू काळ)

वर तुम्ही वाचले, प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत – याचा अर्थ वर्तमानकाळाचे चार, भूतकाळाचे चार आणि भविष्यकाळाचे चार प्रकार असा झाला.

वर्तमानकाळाचे चार प्रकार म्हणजे –

१) साधा वर्तमानकाळ – Simple Present Tense
२) चालू वर्तमानकाळ – Continuous Present Tense
३) पूर्ण वर्तमानकाळ – Perfect Present Tense
४) पूर्ण चालू वर्तमानकाळ. – Perfect Continuous Present Tense

भूतकाळाचे चार प्रकार म्हणजे –

१) साधा भूतकाळ – Simple Past Tense
२) चालू भूतकाळ – Continuous Past Tense
३) पूर्ण भूतकाळ – Perfect Past Tense
४) पूर्ण चालू भूतकाळ. Perfect Continuous Past Tense

भविष्यकाळाचे चार प्रकार म्हणजे

१) साधा भविष्यकाळ – Simple Future Tense
२) चालू भविष्यकाळ Continuous Future Tense
३) पूर्ण भविष्यकाळ – Perfect Future Tense
४) पूर्ण चालू भविष्यकाळ – Perfect Continuous Future Tense

असे एकूण उपप्रकार झाले बारा. या बारापैकी तीन साधे काळ आहेत (साधा वर्तमानकाळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ), तीन चालू काळ आहेत, तीन पूर्ण काळ आहेत व बाकीचे तीन पूर्ण चालू काळ आहेत. या बारा काळांचा अभ्यास आपण चार वर्तमानकाळ, चार भूतकाळ आणि चार भविष्यकाळ या क्रमाने करण्याऐवजी तीन साधे काळ, तीन चालू काळ, तीन पूर्ण काळ आणि तीन पूर्ण चालू काळ या क्रमाने करणार आहोत. हा क्रम काळांचा उपयोग समजण्यासाठी जास्त योग्य राहील.