राष्ट्रभावनेचा उदय व विकास (Emergence and spread of nationalism in India) : Mpsc Notes

राष्ट्रभावनेचा उदय व विकास (Emergence and spread
of nationalism in India)

प्रास्ताविक:

• राष्ट्र म्हणजे आपण सर्वार्थाने एक आहोत अशी एकत्वाची भावना बाळगणारा समूह होय. ब्रिटिश येण्यापूर्वी भारतीय समाज विविध प्रदेश, विविध राजवटी, विविध भाषा-धर्म-पंथ यांबरोबरच दळणवळणाच्या साधनांचा अभावामुळे परस्परांपासून विभक्त होता. त्यामुळे अखिल-भारतीय आधारावर राष्ट्रवादाची आधुनिक भावना मुळातच भारतीयांमध्ये नव्हती.

• काही ब्रिटिश इतिहासकार म्हणतात की राष्ट्रवाद हे ब्रिटिशांनी दिलेले अपत्य आहे. पण खऱ्या अर्थाने बघता भारतीय राष्ट्रवाद हा अंशतः युरोपातील विविध क्रांत्यांच्या प्रभावाने झालेली १राजकीय जागृती, अंशतः इंग्रजांनी भारतात चालना दिलेल्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतून झालेले भारतीयांचे प्रबोधन व अंशतः ब्रिटिशांनी आपला आर्थिक साम्राज्यवाद जोपासण्यासाठी जी धोरणे राबविली त्यांच्याविरूद्ध भारतीयांची वाढत गेलेली तीव्र प्रतिक्रिया यांचा परिणाम आहे.

• भारतात १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रवादाचा उदय व विकास झाला. या प्रकरणात राष्ट्रवादाच्या उदय व विकासाच्या मुळाशी असलेल्या कारणांची व प्रक्रियांची चर्चा केली आहे.

ब्रिटिश सत्तेचे परिणाम (Effects of British Rule)

• आधुनिक भारतीय राष्ट्रवाद मुळातच निर्माण झाला तो परकीय सत्तेचे आव्हान पेलण्याच्या प्रक्रियेतून. ब्रिटिश सत्तेचे स्वरूपच असे होते की, त्याला प्रतिक्रिया म्हणून भारतीय जनतेत राष्ट्रभावनांचा विकास होत गेला. ब्रिटिश सत्तेच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणामांनीच भारतातील राष्ट्रीय चळवळीच्या विकासासाठी भौतिक, नैतिक व बौद्धिक परिस्थिती उपलब्ध करून दिली:

i)हितसंबंधांचा संघर्ष(Conflict of interests): भारतीय जनता व ब्रिटिश सत्ता यांच्यातील हितसंबंधाचा संघर्ष, हेच खरे राष्ट्रवादाच्या उदयाचे मूळ होते. ब्रिटिशांनी भारताला मुळातच जिंकून घेतले ते स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी. भारतीयांना हळूहळू ध्यानात येत गेले की, लॅन्कॅशायरचे कापड उत्पादक व इतर ब्रिटिश हितसंबंधांसाठी भारतीयांच्या हितांना तिलांजली दिली जात आहे.

ii)भारताचा आर्थिक मागासलेपणाः भारतीय राष्ट्रीय चळवळीचा पाया या वस्तुस्थितीवर आधारलेला होता की, ब्रिटिश सत्ता ही भारताच्या आर्थिक मागसलेपणाचे प्रमुख कारण ठरत आहे. ब्रिटिश सत्ता भारताच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक व राजकीय विकासाच्या मार्गात अडथळा ठरत आहे, असे वाटणाऱ्या भारतीयांची संख्याही सतत वाढत गेली.

भारतीय समाजाच्या सर्व गटांवर प्रभाव:

• हळूहळू भारतीय समाजाच्या सर्व वर्गांना/गटांना कळून चुकले की परकीय सत्तेमुळे त्यांचे हितसंबंध धोक्यात आले आहेत.

१)शेतकरीः शेतकरी हे बघत होता की, सरकार त्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा महसूल म्हणून घेऊन जाते. तसेच त्याचे शोषण करणाऱ्या जमीनदार-व्यापारी-सावकार यांप्रतीही सरकार व सरकारी यंत्रणा (पोलिस, न्यायालये, अधिकारी) धार्जिणीच आहेत. शेतकऱ्यांनी जमीनदार-सावकारांच्या छळाविरूद्ध बंड केल्यास सरकार पोलिस व लष्कराचा वापर शेतकऱ्यांच्या दडपशाहीसाठी करते.

२)हस्तकारागीरः त्यांचा विनाश ब्रिटिश सत्तेने निर्माण केलेल्या परकीय स्पर्धेमुळे झाला, मात्र त्यांचे पुनर्वसन करण्याचा कोणताही प्रयत्न ब्रिटिश सत्तेने केला नाही.

३)कामगार वर्गः आधुनिक उद्योग, खाणी व मळ्यांवरील कामगारांनाही, विशेषतः २० व्या शतकाच्या सुरूवातीला, ध्यानात आले की, सरकार भांडवलदारांच्या, विशेषतः परकीय भांडवलदारांच्या बाजुने आहे. कामगारांनी आपली स्थिती सुधारण्यासाठी जर कामगार संघटनेच्या माध्यमातून संप, निदर्शनेकेली तर सरकार मुक्तपणे सरकारी यंत्रणेचा वापर त्याच्याविरूद्ध करते. त्याला ध्यानात आले की, वेगवान औद्योगिकीकरणातून बेरोजगारी होईल, मात्र ते केवळ स्वतंत्र राष्ट्रीय सरकारच घडवून आणू शकते.

४)शिक्षित भारतीय व्यक्तीः शिक्षित भारतीयांच्या उदयोन्मुख बुद्धिजीवी वर्गाने आपल्या नवीन ज्ञानाचा वापर देशाची बिघडलेली आर्थिक व राजकीय स्थिती समजवून घेण्यासाठी केला. सुरूवातीला ब्रिटिश सत्तेला पाठिंबा देणारेही नाराज झाले. ब्रिटिश भांडवलामुळे भारतातील उत्पादक शक्ती विकसित होतील ही त्याची आशा प्रत्यक्षात आली नाही.

वृत्तपत्रे व साहित्याची भूमिका(Role of National Press and Literature)

• वृत्तपत्रे हे एक असे प्रमुख माध्यम ठरले, ज्यातून राष्ट्रवादी विचारांच्या भारतीयांनी राष्ट्रभक्तीचा संदेश आणि आधुनिक आर्थिक-सामाजिक-राजकीय विचारांचा प्रसार घडवून आणला, व त्यातून अखिल-भारतीय सचेतना निर्माण केली.१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक राष्ट्रवादी वृत्तपत्रे निर्माण झाली. बहुतेक राष्ट्रीय नेत्यांनी स्वतःची वृत्तपत्रे, बऱ्याचदा एकापेक्षा अधिक, सुरू केली/संपादित केली. या वृत्तपत्रामधूनः

i)सरकारी धोरणांवर सतत टिका केली जात असे,
ii)भारतीय मते व मुद्दे मांडले जात असत,
iii)लोकांना एकत्रित येण्यासाठी व राष्ट्रकल्याणासाठी कार्य परकीय करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असे.
iv)स्वशासन, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद,राष्ट्रवादी औद्योगिकीकरण इत्यादी विचार लोकांमध्ये रूजविण्याचे आफ्रिकेत प्रयत्न केले जात असत.
v)वृत्तपत्रांनी देशाच्या विविध भाषांतील राष्ट्रीय कार्यकर्त्यांना आपल्या मतांच्या आदानप्रदानासाठीही मदत केली.

• त्याचबरोबर कादंबऱ्या, निबंध, देशभक्तीपर कविता यांच्या स्वरूपातील राष्ट्रीय साहित्यानेही राष्ट्रीय सचेतना निर्माण करण्याची महत्वाची भूमिका बजावली. तत्कालिन प्रमुख साहित्यकारांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश होताi)बंगालीतील बंकिमचंद्र चटर्जी व रविंद्रनाथ टागोर,
ii)आसामी भाषेतील लक्ष्मीकांत बेझबरूआ,
iii)मराठीतील विष्णूशास्त्री चिपळूणकर,
iv)तमिळमधील सुब्रम्हणम भारती,
v)हिंदीतील भारतेंदु हरिश्चंद्र,
vi)ऊर्दूतील अलताफ हुसेन हाली.

भारताचे प्रशासकीय, आर्थिक व भौगोलिक एकीकरण (Administrative, economic and geographical unification of India)

• १९ व २० व्या शतकात भारत एक राष्ट्र बनत गेला. ही राष्ट्रवादी भावना विकसित होण्यामागे ब्रिटिशांनी घडवून आणलेले भारताचे व प्रशासकीय, आर्थिक व भौगोलिक एकीकरण कारणीभूत ठरले. त्यातून भारताचे भावनिक एकीकरण घडून आले.

१) ब्रिटिशांनी क्रमाक्रमाने देशात प्रशासनाची एकसमान व आधुनिक व्यवस्था लागू केली. त्यातून प्रशासकीय एकीकरण घडून आले.

२) ब्रिटिशांनी ग्रामीण व स्थानिक अर्थव्यवस्थेचा विनाश घडवून आणून अखिल-भारतीय स्तरावर आधुनिक उद्योग व व्यापार पद्धती लागू केली. त्यामुळे भारतीयांचे आर्थिक जीवन एकत्र बांधले गेले. उदा. एका प्रदेशात दुष्काळ व टंचाई निर्माण झाल्यास दुसऱ्या प्रदेशातील किंमती व अन्नाच्या उपलब्धतेवर परिणाम होत असे.

३) रेल्वे, टेलिग्राम व टपाल व्यवस्थेमुळे भारतीयांचे भौगोलिक एकीकरण घडून आले. त्यामुळे लोकांमधील, विशेषतः नेत्यांमधील संपर्क वाढला.

• याबाबतीतही, सर्व भारतीयांचे जात, धर्म, प्रदेश, गट यांचा विचार न करता दमन करणाऱ्या परकीय सत्तेचे अस्तित्व एक प्रकारे भारतीयांना एकत्र जोडणारा घटक (unifying factor) ठरले .अशा रीतीने, समान शत्रुमुळे (ब्रिटिश सत्ता) राष्ट्रवाद निर्माण झाला, त्यातून साम्राज्यवादविरोध निर्माण होऊन राष्ट्रीय चळवळ निर्माण झाली.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा