मराठी नाम व नामाचे प्रकार – Noun in Marathi Grammar
Noun in Marathi : मराठी नाम व नामाचे प्रकार – सामान्यनाम । विशेषनाम । भाववाचक नाम
नाम : प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना
व्याकरणात नामे असे म्हणतात.
पुढील वाक्ये वाचा.
१) तो झाड लावतो.
२) आरोही, फळा पाहा.
३) अनुराग गोष्ट ऐकतो.
४) नदीला पूर आला.
५) मला पुस्तक आवडते.
• वरील वाक्यांतील ‘झाड‘, ‘आरोही‘, ‘फळा’, ‘अनुराग‘, ‘गोष्ट‘, ‘नदी‘, ‘पुस्तक‘ हे शब्द पाहा. हे शब्द वाचले की आपल्या डोळ्यांसमोर काही वस्तू येतात, व्यक्ती येतात.
• सामान्यतः ‘वस्तू‘ हा शब्द डोळ्याने दिसणाऱ्या पदार्थाला उद्देशून वापरतो, पण व्याकरणात त्याचा अर्थ व्यापक आहे.
• ‘वस्तू‘ या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी वास करणारे गुण व धर्म यांचा अंतर्भाव होतो.
उदा. पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा,
औदार्य, विद्वत्ता इत्यादी.
‘मराठी – घटना, रचना, परंपरा‘ या ग्रंथात (लेखक – अरविंद मंगरूळकर व कृ. श्री. अर्जुनवाडकर यांनी) नामाची व्याख्या करताना म्हटले आहे, ‘वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्या शब्दांना नामे असे म्हणतात.’
वेगळ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हणता येईल की, ज्यावरून एखादा प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ, प्राणी किंवा त्याचा गुणधर्म यांचा आपल्याला बोध होतो, त्याला नाम असे म्हणतात.
नामांचे तीन प्रकार पडतात – Types Of Noun in Marathi
सामान्यनाम, विशेषनाम व भाववाचक नाम या तीन नामांची विभागणी या दोन प्रकारात होते.
१) धर्मिवाचक:- सामान्यनाम व विशेषनाम
२) धर्मवाचक – भाववाचक नाम
धर्मिवाचक : – गुण म्हणजे धर्म, गुण ज्यामध्ये असतो तो धर्मी. कुठलाही गुण स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतो तो कुठल्या न कुठल्या पदार्थात, वस्तूत, व्यक्तीत असतो. म्हणून ज्या नामांनी गुण धारण करणान्या प्राण्यांचा वा पदार्थाचा वा त्यांच्या समुदायांचा बोध होतो त्या नामांना धर्मिवाचक नामे म्हणतात.
गुण असलेल्या सजीव प्राण्यांचा वा निर्जीव वस्तूंचा निर्देश करणारी ती धर्मिवाचक नामे.
धर्मिवाचक नामे दोन प्रकारची असतात –
१) सामान्यनाम आणि २) विशेषनाम,
सामान्यनाम
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते. त्याला सामान्यनाम असे म्हणतात.
सामान्यनाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाम आहे.
उदा. मुलगा, लेखणी, घर, शाळा, नदी इत्यादी.
सामान्यनामांचे प्रकार :- कळप, वर्ग, सैन्य, घट, समिती ही समूहाला दिलेली नामे आहेत. यांना कोणी समुदायवाचक नामे म्हणतात.
तसेच सोने, तांबे, दूध, साखर, कापड हे संख्येशिवाय इतर परिमाणांनी मोजण्याचे पदार्थ म्हणून त्यांना कोणी पदार्थवाचक नामे असे म्हणतात.
पण मराठीत या सर्वांची गणना सामान्यनामातच होते.
विशेषनाम
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्यास विशेषनाम असे म्हणतात.
उदा. रामा, हरी, आशा, हिमालय, गंगा, भारत,
विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, सामान्यनाम हे जातिवाचक असते.
- विशेषनाम हे त्या व्यक्तीचे अर्थवा वस्तूचे स्वतःचे नाव असते; ते केवळ खुणेकरिता ठेवलेले नाव असते.
- सामान्यनाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंत असलेल्या समान गुणधर्माला दिलेले नाव असते.
- सामान्यनाम ही त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते. विशेषनाम हे एकट्याचे असते.
भाववाचक नाम (धर्मवाचक नाम)
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला ‘भाववाचक नाम’ किंवा ‘धर्मवाचक नाम’ असे म्हणतात.
उदा. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इत्यादी.
- पदार्थाचा गुण किंवा धर्म हा स्वतंत्र किंवा वेगळा असत नाही.
- तो कोणत्यातरी जड वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या आश्रयाने राहतो.
- भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते. मात्र कल्पनेने ते आहे असे मानून त्याला नाव दिले जाते.
- पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना भाववाचक नामे असेच म्हणतात.
- उदा. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात. धाव, हास्य, चोरी, उड्डाण,
- नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत.
- सामान्यनाम किंवा विशेषनाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो.
- भाववाचक नामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो.
- सामान्यनामाचे अनेकवचन होऊ शकते, पण विशेषनामे आणि भाववाचक नामे ही एकवचनीच असतात.
- तसेच सामान्यनामापैकी पदार्थवाचक नामे एकवचनीच असतात.
आपण बघितलं आहे नाम व नामाचे प्रकार मराठी – Noun and types in Marathi