प्रयोग व प्रयोगाचे प्रकार – मराठी व्याकरण

◆ प्रयोग

● ‘वाक्यविचार’ करताना आपण बरीच माहिती मिळविली. वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह होय. वाक्यातील सर्वांत महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद होय. वाक्यरूपी कुटुंबाचा तो प्रमुख असतो. क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा वाक्यात जो कोणी असतो, त्यास कर्ता असे म्हणतात.
● वाक्यात निर्देशिलेली क्रिया कर्त्यांशीच न थांबता ती कधी-कधी पुढे जाते व ती ज्याच्यावर घडते, ते त्या
वाक्यातील कर्म होय. कर्ता, कर्म, क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक असतात.

◆ ‘प्रयोग’ म्हणजे काय?

● वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते.
वाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

● ‘प्रयोग’ हा शब्द संस्कृत ‘प्र-युज’ (= योग) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘जुळणी’ किंवा ‘रचना’ असा आहे. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की, ते क्रियापद कधी कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी ते क्रियापद मुळीच बदलत नाही. कर्त्यांची किंवा कर्माची
क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात.

◆ वाक्याचे मूलाधार आणि प्रयोग

● “वाक्यातील रचना मुख्यतः ज्यांच्या आधाराने होते ते वाक्याचे घटक कर्ता, कर्म आणि क्रियापद होत. स्थिती किंवा कृती यांचा बोध करून वाक्यार्थाला पूर्णता आणणारा, वाक्यातील सर्वप्रधान शब्द म्हणजे क्रियापद. या क्रियापदाने सांगितली जाणारी स्थिती किंवा कृती जो अनुभवतो किंवा करतो तो कर्ता आणि त्याच्या कृतीचा परिणाम ज्याच्यावर होतो किंवा जे त्याच्या कृतीचा विषय बनते, ते कर्म.
● या घटकांपैकी ज्याला प्राधान्य द्यावे लागते, त्याच्या अनुरोधाने वाक्याची ठेवण बदलते. मुख्य घटकांच्या
अनुरोधाने बदलणारी वाक्याची ही ठेवण म्हणजेच प्रयोग.” हे ‘मराठी – घटना, रचना, परंपरा’ (लेखक
मी. अरविंद मंगरूळकर व कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर) या ग्रंथातील विवेचन ‘प्रयोग’ या संदर्भात अधिक मदत करणारे ठरते.

कर्ता आणि कर्म

● क्रियापदांचा विचार करताना कर्ता व कर्म यांचा शोध कसा घ्यावा याचा विचार आपण केला आहे.
त्याची उजळणी आपण थोडक्यात करू या.

कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला ‘- णारा’प्रत्यय लावून ‘कोण?’ असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो.

उदा. (१) ‘रामा आंबा खातो.’ या वाक्यात ‘खा’ हा धातू आहे. त्याला
–णारा’ हा प्रत्यय लावून ‘खाणारा कोण?’ असा प्रश्न विचारला की, ‘रामा’ हे उत्तर
मिळते. ‘रामा’ हा या वाक्यातील कर्ता आहे.(२)‘विद्यार्थी प्रामाणिक आहे. या वाक्यात ‘आहे’ हे क्रियापद आहे. ‘अस’ हा धातू आहे.’असणारा कोण?’ असा प्रश्न विचारल्यावर ‘विद्यार्थी हे उत्तर मिळाले. म्हणून ‘विद्यार्थी’हा कर्ता होय.
(३) ‘मला दूध आवडते. या वाक्यात आवडते’ हे क्रियापद आहे. आवड हा धातू आहे.’आवडणारे कोण?’ असा प्रश्न विचारल्यावर ‘दूध हे उत्तर आले म्हणून ‘दूध’ हा शब्द या वाक्यातील कर्ता होय.

वाक्यातील क्रियापदाने दाखविलेली क्रिया कापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर किंवा कशावर तरी घडते .त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे क्रियेचा रोख किंवा कल असतो ते त्या क्रियेचे कर्म असते.

● वरील वाक्यांपैकी ‘रामा आंबा खातो.’ या वाक्यातील कर्म शोधताना ‘खाण्याची क्रिया कोणावर घडते?’ या प्रश्नाचे उत्तर ‘आंब्यावर’ असे येते, म्हणून ‘आंबा’ हे या वाक्यातील ‘कर्म’ होय.

सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद

● प्रयोगाचा अभ्यास करताना ‘सकर्मक क्रियापद’ व ‘अकर्मक क्रियापद’ या क्रियापद प्रकारांची धोडक्यात उजळणी आवश्यक ठरते.

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते, त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात.ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही. त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते, तेव्हा त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल,
तर ते क्रियापद ‘अकर्मक’ असते.
सामान्यतः कृतिवाचक धातू सकर्मक असतात, तर स्थितिवाचक व स्थित्यंतरवाचक धातू अकर्मक
असतात.

काही अकर्मक धातू –
(१) अस, नस, हो, नहो, ऊठ, बस. नीज, झोप, थरथर, रड, पड, सर, मर, धाव, थांब, धक, शक,
जाग, झीज, जळ, किंचाळ, तूट, सूट, उजळ, प्रकाश, ओरड, घोर, सळसळ, कीड, राह, वाह,
फूल, उमल, उपज, जन्म, पीक, लोळ, पोळ, वाज, भीज इत्यादी.
(२) हद, पाहिजे, आवड, वाट, रूच, दीस, परवड, मीळ, कळ, शोभ, लाज, भी, घाबर, हस या
दुसऱ्या गटातील धातूंच्या प्रयोगात संप्रदान, अपादान किंवा अधिकरण अशा अर्थाने एखादे
चतुर्थ्यन्त पद येते.

प्रयोगाचे प्रकार

प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत : (१) कर्तरी प्रयोग (२) कर्मणी प्रयोग (३) भावे प्रयोग
● कर्तरी प्रयोग

पुढील वाक्ये पाहा.
(१) तो गाणे गातो.
(३) ते गाणे गातात.
(२) ती गाणे गाते.
(४) तू गाणे गातोस.
यातील पहिल्या वाक्यात ‘तो’ हा कर्ता आहे. ‘गाणे’ हे कर्म आहे आणि ‘गातो’ हे क्रियापद आहे. या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी गातो हे क्रियापद कोणाप्रमाणे बदलते हे पाहणे आवश्यक आहे.

● ते कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते, हे आपण शोधू या. त्यासाठी क्रमाने लिंग, वचन व पुरुष बदलून पाहू. असा बदल करताना एका वेळी एकच प्रकारचा बदल करणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.

वाक्य क्र. २ पाहा. ‘तो’ या पुल्लिंगी कर्त्याच्या ठिकाणी ‘ती’ हा स्त्रीलिंगी कर्ता ठेवला. त्याबरोबर ‘गातो’ हे क्रियापदाचे रूप बदलले व ते गाते’ असे झाले म्हणजे या वाक्यातील क्रियापद हे कर्त्यांच्या लिंगाप्रमाणे बदलते, असे ठरले.
● वाक्य क्र. ३ पाहा. ‘तो’ या कर्त्याचे अनेकवचनी रूप ते ठेवले. त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘गातात’
असे झाले.
वाक्य क्र. ४ पाहा. कर्त्याचा पुरुष बदलून ‘तू’ हा द्वितीय पुरुषी कर्ता ठेवताच क्रियापदाचे रूप ‘गातोस’
असे झाले.
याचा अर्थ असा की, ‘तो गाणे गातो.’ या वाक्यातील ‘गातो’ हे क्रियापद कांचे लिंग, वचन व पुरुष यांप्रमाणे बदलले आहे म्हणजेच इथे क्रियापद हे कर्त्यांच्या तंत्राप्रमाणे चालते, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगात कर्ता हा आपली हुकमत चालवितो. कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश (क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा) असतो.
कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असले, तर त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. क्रियापद हे अकर्मक असल्यास त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा.
• ती गाणे गाते. (सकर्मक कर्तरी प्रयोग)
• ती घरी जाते. (अकर्मक कर्तरी प्रयोग)

• कर्तरी प्रयोगाची खूण
कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमान्तच असतो व कर्म हे प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते.
उदा. (१) मी शाळेतून आत्ताच आलो. (प्रथमान्त कर्ता)
(२) पोपट पेरू खातो. (प्रथमान्त कर्म)
(३) शिक्षक मुलांना शिकवितात. (द्वितीयान्त कर्म)

कर्मणी प्रयोग पुढील वाक्ये पाहा.
(१) मुलाने आंबा खाल्ला.
(२) मुलीने आंबा खाल्ला. (३) मुलांनी आंबा खाल्ला.
(४) मुलाने चिंच खाल्ली. (५) मुलाने आंबे खाल्ले.

● वरील वाक्यात ‘मुलाने’ हा कर्ता आहे. (वाक्य क्र. १) आता या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी कर्त्याचे लिंग व वचन बदलून पाहा. ‘मुलाने’ याच्याऐवजी ‘मुलीने’ किंवा ‘मुलांनी’ असा कर्ता बदलला, तरी क्रियापदाचे रूप ‘खाल्ला’ असेच राहते. (वाक्य क्र. २ व ३ पाहा) कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही, म्हणून हा कर्तरी प्रयोग नव्हे.
● आता कर्माचे लिंग बदलून पाहा. ‘आंबा’ ऐवजी ‘चिंच’ हे स्त्रीलिंगी कर्म ठेवले, तर क्रियापदाचे रूप ‘खाल्ली’ असे होईल. आता वचन (वाक्य ४ व ५) बदलून पाहा. ‘आंबे’ हे कर्म झाले, तर ‘मुलाने आंबे खाल्ले.’ असे वाक्य होईल व त्यात क्रियापद ‘खाल्ले’ असे होईल म्हणजे या वाक्यात कर्माच्या
लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते, म्हणजेच कर्म हा धातुरूपेश आहे.
कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार असणार नाहीत. कारण कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होणार नाही. या प्रयोगातील क्रियापद सकर्मक हवे.

● कर्मणी प्रयोगाची खूण
कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमान्त असते. कर्ता प्रथमान्त कधीच नसतो. कर्ता तृतीयान्त, चतुर्थ्यन्त,सविकरणी तृतीयान्त किंवा शब्दयोगी अव्ययान्त असतो..
प्रयोग
उदा.
(१) तिने गाणे म्हटले. (तृतीयान्त कर्ता व प्रथमान्त कर्म)
(२) मला हा डोंगर चढवतो. (चतुर्थ्यन्त कर्ता)
(३) रामाच्याने काम करवते. (सविकरणी तृतीयान्त कर्ता)
(४) मांजराकडून उंदीर मारला गेला. (शब्दयोगी अव्ययान्त कर्ता)
वरील चारही वाक्यांत प्रयोग कर्मणी असला, तरी त्याचेही विविध प्रकार आहेत.

(१) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग :- या प्रयोगात क्रियापद हे लिंगवचनानुसार बदलत असले, तरी
बहुतेक कर्ताच प्रधान असतो. त्यास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. वरील वाक्ये
क्र.१ व २ ही याची उदाहरणे आहेत.
(२) शक्य कर्मणी प्रयोग :- वाक्य क्र. ३ मध्ये शक्यता सुचविलेली आहे. यातील क्रियापद ‘शक्य
क्रियापद’ आहे. त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
(३) प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ‘ज’ हा प्रत्यय लावून ‘करिजे, बोलिजे, कीजे, देईजे,’
अशी कर्मणी प्रयोगाची उदाहरणे पाहावयास मिळतात. उदा.

(१) त्वां काय कर्म करिजे लघू लेकराने ।
(२) नळे इंद्रासी असे बोलिजेलें
(३) जो-जो कीजे परमार्थ लाहो.
(४) द्विजी निषिधापासाव म्हणीजेलो.
या प्रकाराच्या प्रयोगास प्राचीन किंवा पुराण कर्मणी असे म्हणतात.

● (४) ‘त्याची गोष्ट लिहून झाली. या प्रकारच्या वाक्यात त्याची’ हा कर्ता षष्ठी विभक्तीत आहे.
‘लिहून झाली.’ या संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. अशा
प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात.
● (५) कर्मणी प्रयोगातील कर्त्याला ‘कडून’ हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे
रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे, त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हणतात.
उदा. ‘शिपायाकडून चोर पकडला गेला.’

कर्मकर्तरी प्रयोग

पुढील वाक्ये पाहा.
(१) राम रावणास मारतो. (२) रावण रामाकडून मारला जातो.
● दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळजवळ एकच आहे. पहिल्या वाक्यात ‘मारतो या क्रियापदाचा कर्ता ‘राम’हा असून ‘रावण’ हे कर्म आहे. दुसऱ्या वाक्यात’रावण’ हा कर्ता आहे म्हणजे पहिल्या वाक्यातील कर्म हे दुसऱ्या वाक्यात कर्ता बनले आहे व मूळच्या वाक्यातील कर्त्याला ‘कडून’ हे शब्दयोगी अव्यय जोडले असून मूळ धातूच्या भूतकाळी रूपापुढे ‘जा’ या धातूचे मूळच्या काळातील रूप ठेवले आहे. पहिल्या वाक्यात ‘राम’ या शब्दास प्राधान्य आहे व त्याचा प्रयोग ‘कर्तरी’ आहे, तर दुसऱ्या वाक्यात ‘रावण’ या शब्दाला म्हणजे मूळच्या वाक्यातील कर्माला प्राधान्य दिल्यामुळे जो प्रयोग बनता आहे, त्यास कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतात.

अशी वाक्यरचना इंग्रजीत करीत असल्याने इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसला मराठीत कर्मकर्तरी असे म्हणतात. सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदन्ताला ‘जा’ या सहाय धातूची मदत देऊन हा प्रयोग करतात. कर्म कर्तरीला काही जण नवीन कर्मणी असे म्हणतात. जेव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान
करावयाचे असते किंवा कर्ता स्पष्ट नसतो, किंवा काचा उल्लेख टाळावयाचा असतो, त्या वेळी हा कर्मकर्तरी
प्रयोग विशेष सोयीचा वाटतो.

● कर्मकर्तरी प्रयोगाची काही उदाहरणे
(१) गाय गुराख्याकडून बांधली जाते. (२) न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.
(३) सभेत पत्रके वाटली गेली.
(४) सर्वांना समज दिली जाईल.

● भावे प्रयोग
पुढील वाक्य पाहा.
मुलाने बैलास मारले.
या वाक्यातील कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग व वचन बदलून पाहू. ‘मुलाने’ या ऐवजी ‘मुलीने किंवा
‘मुलांनी’ असा कर्ता ठेवला, तरी क्रियापदाचे रूप मारले’ असेच राहते. ‘बैलास’ या कमएिवजी ‘गाईस’ असे स्त्रीलिंगी रूप किंवा ‘बैलांना’ असे अनेकवचनी रूप ठेवले, तरी क्रियापदाचे रूप ‘मारले’ असेच राहते.

● जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात.
भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय त्याला प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म हि दोन्ही गौण असतात.

या प्रयोगाची आणखी काही उदाहरणे पाहा.
(१) रामाने रावणास मारले.
(२) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
(३) त्याने आता घरी जावे.
(४) त्याला घरी जाववते.
यांतील पहिली दोन वाक्ये सकर्मक आहेत व पुढील दोन वाक्ये अकर्मक आहेत. भावे प्रयोगाचे
(१) सकर्मक भावे प्रयोग व (२) अकर्मक भावे प्रयोग असे दोन प्रकार आहेत.

● भावे प्रयोगाची खूण
(१) कर्ता तृतीयान्त किंवा चतुर्थ्यन्त असतो.
(वरील वाक्ये क्र. १ व ४)
(२) कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी द्वितीया विभक्ती असते.
(वाक्ये क्र.१ व २)
(३) अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विध्यर्थी असते.
(वाक्य क्र. ३)
(४) शक्यार्थक क्रियापदांचा नेहमीच भावे प्रयोग होतो.
(वाक्य क्र. ४)

Leave a Reply