शब्दयोगी अव्यये : शब्दयोगी अव्ययांचे प्रकार

शब्दयोगी अव्यये – Shabdayogi Ayavye in Marathi , प्रकार उदाहरणे

पुढील उतारा वाचा.
“जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली. साळुकीने घरट्याबाहेर झेप घेतली. तिच्या मागोमाग तिचा जोडीदारही बाहेर पडला. याच संधीची तो मुलगा मघापासून वाट पाहत होता. त्याची आई
जाईच्या मांडवाखाली फुले वेचीत होती. साळुकी दूर हिरवळीवर पिलांसाठी चारा टिपत होती.”


वरील उताऱ्यातील ‘वर, बाहेर, ही, पासून, खाली, साठी हे रंगीत टाइपात छापलेले शब्द त्यांच्यामागे
असलेल्या शब्दांना जोडून आलेले दिसतात. ते ज्या शब्दांना जोडून आलेले आहेत, त्यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध जोडण्याचे काम ते करतात.

उदा. पहिल्या वाक्यातील वर हा शब्द मांडव
शब्दाला जोडून आला आहे आणि तो मांडव व पसरती’ या शब्दांचा संबंध जोडण्याचे काम करतो. हे
शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना ‘शब्दयोगी अव्यय’ असे म्हणतात. लिहितानादेखील हे शब्द मागील शब्दांना जोडूनच लिहावयास हवेत.

शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यये

तसे पाहिले, तर शब्दयोगी अव्यये स्वतंत्र असे शब्द नाहीत. ‘वर, खाली, मागे, पुढे. बाहेर, पूर्वी,
समोर’ यांसारखे शब्द मूळची क्रियाविशेषण अव्यये आहेत. पण वर उताऱ्यातील वर, खाली, बाहेर’ हे शब्द स्वतंत्रपणे येऊन क्रियापदाबद्दल विशेष अशी माहिती सांगत नाहीत, म्हणून ती क्रियाविशेषणे नाहीत. वरील वाक्यांत त्यांचे कार्य त्याहून वेगळे आहे. ते शब्दांना (सामान्यतः नामांना किंवा नामाचे कार्य करणाऱ्या इतर शब्दांना) जोडून येऊन त्यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध जोडतात. ही शब्दयोगी अव्यये नसती, तर त्या वाक्याचा अर्थ नीट लागला नसता, शब्दयोगी अव्ययांच्या रूपांमध्ये लिंग, वचन, विभक्ती. पुरुष, यांमुळे बदल किंवा विकार होत नाही म्हणून त्यांना अविकारी किंवा अव्यये असे म्हणतात.


शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यये यांतील फरक
पुढील दोन गटांतील वाक्ये पाहा.
गट १. गट २
(१) पतंग झाडावर अडकला. (१) पतंग वर जात होता.
(२) टेबलाखाली पुस्तक पडले. (२) मला खाली बसणे आवडते.
(३) सूर्य ढगामागे लपला. (३) मागे या ठिकाणी विहीर होती.

वरील दोन्ही गटांत ‘वर, खाली, मागे’ हे शब्द दिसतात. पहिल्या गटातील शब्द शब्दयोगी अव्ययांचे काम करतात. कारण ते शब्द अगोदरच्या शब्दाला जोडून आले आहेत. दुसऱ्या गटातील तेच शब्द क्रियाविशेषण अव्यये आहेत. कारण ते क्रियापदाबद्दल अधिक माहिती देऊन ‘अव्यये’ राहतात.

महत्त्वाचे :- शब्दयोगी अव्यये सामान्यतः नामांना जोडून येतात. असे असले, तरी शब्दयोगी अव्यये क्रियापदे आणि क्रियाविशेषणे यांनाही कधी-कधी जोडून येतात. जसे- येईपर्यंत, बसल्यावर, जाण्यापेक्षा, बोलण्यामुळे, परवापासून, यंदापेक्षा, केव्हाच, थोडासुद्धा इत्यादी.

शब्दयोगी अव्ययांचे प्रकार
शब्दयोगी अव्ययांचे त्यांच्या अर्थावरून पुढील प्रकार पडतात.
शब्दयोगी अव्ययांचे प्रकार
प्रकार
(१) कालवाचक
(अ) आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो.
(आ) गतिवाचक- आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून.
(२) स्थलवाचक आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक,
समीप, समक्ष.
(३)करणवाचक मुळे, योगे, करून, कडून, द्वारा, करवी, हाती.
(४) हेतुवाचक साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव.
(५) व्यतिरेकवाचक शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, परता.
(६) तुलनावाचक पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस.
(७) योग्यतावाचक योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकूम.
(८) कैवल्यवाचक च, मात्र, ना, पण, फक्त, केवळ,
(९) संग्रहवाचक सुद्धा, देखील, ही, पण, बरीक, केवळ, फक्त.
(१०) संबंधवाचक
विशी, विषयी, संबंधी.
(११) साहचर्यवाचक बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, निशी, समवेतबरोबर,
(१२) भागवाचक
पैकी, पोटी, आतून.
(१३) विनिमयवाचक
बद्दल, ऐवजी, जागी, बदली.
(१४) दिक्वाचक
प्रत, प्रति, कडे, लागी.
(१५) विरोधवाचक
विरुद्ध, वीण, उलटे, उलट.
(१६) परिमाणवाचक
भर.
वरील तक्त्यावरून असे दिसून येईल की, बहुतेक शब्दयोगी अव्यये साधित म्हणजे दुसऱ्या
शब्दप्रकारांपासून तयार झालेली आहेत.

जसे –
(१) नामसाधित शब्दयोगी अव्यये :- (कड) कडे, (मध्य) मध्ये, (प्रमाण) प्रमाणे, पूर्वी, ज
मुळे, विषयी.
(२) विशेषणसाधित शब्दयोगी अव्यये :- सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध.
(३) धातुसाधित शब्दयोगी अव्यये :- (कर) करिता. (देख) देखीत. (पाव) पावेतो, (लाग) लागी,लागून
(४) क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यये :- खालून, मागून, वरून, आतून. जवळून
(4) संस्कृत शब्दसाधित :- पर्यंत, विना, समक्ष, समीप, परोक्ष.

Table of Contents

सामान्यरूपांचा विचार

विभक्तिप्रत्यय लागताना ज्याप्रमाणे नामांचे किंवा सर्वनामांचे सामान्यरूप होते, त्याचप्रमाणे शब्दयोगी
अव्यय जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होते. जसे मांडव – मांडवाखाली, घरटे – घरट्याबाहेर, घर – घरापुढे
मात्र काही स्थलवाचक, कालवाचक व परभाषेतील विशेषनामे यांचे सामान्यरूप विकल्पाने होते. जसे,
कोल्हापूर :- कोल्हापूरपासून, कोल्हापुरापासून.
इंग्लंड :- इंग्लंडमध्ये, इंग्लंडामध्ये.

शुद्ध शब्दयोगी अव्यये

‘च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा, ही’ ही अशी शब्दयोगी अव्यये आहेत की, ती शब्दाला जोडून
येताना मागील शब्दांची सामान्यरूपे होत नाहीत.

उदा. तूच, आईमात्र, आम्हीदेखील, चंदूही, कुत्रासुद्धा, तुम्हीपण, तोना?
अशा शब्दयोगी अव्ययांना शुद्ध शब्दयोगी अव्यये असे म्हणतात. या शुद्ध शब्दयोगी अव्ययांमुळे
मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो.


विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यये

पुढील वाक्ये पाहा.
(१) त्याच्याकडून हे काम होणार नाही. (तृतीया)
(२) सरला माधुरीपेक्षा उंच आहे. (पंचमी)
(३) देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले. (चतुर्थी)
(४) आम्ही क्रीडांगणावर खेळतो. (सप्तमी)

वरील वाक्यांतीत ‘कडून, पेक्षा, साठी, वर’ ही शब्दयोगी अव्यये अनुक्रमे तृतीया, पंचमी, चतुर्थी,
सप्तमी या विभक्तिप्रत्ययांची कार्ये करतात. विभक्तिप्रत्ययांची कार्ये करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांना विभक्ती प्रतिरुपक अव्यये असे म्हणतात.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा