Simple Present Tense in English – साधा वर्तमानकाळ

Simple Present Tense in English – साधा वर्तमानकाळ |English Grammar Rules

• साध्या वर्तमानकाळाची वाक्ये तुम्हाला बोलताना लागणार आहेत, म्हणून या काळाची वाक्ये कशी असतात, त्यांना इंग्रजीत बोलायच कसं ते आपण आता पहायचं आहे. पहिल्यांदा आपण या काळाचा उपयोग लक्षात घेऊ. उपयोग समजण्यासाठी साध्या वर्तमानकाळाची काही मराठीची वाक्ये पहा –

• वाक्यातील क्रिया कशा प्रकारची आहे तिकडे लक्ष द्या.
१) सूर्य पूर्वेस उगवतो.
२) हरी खोटे बोलतो.
३) रमेश अमेरिकेत राहतो. ४) तो सकाळी लवकर उठतो.
५) ते रोज १६ तास काम करतात. ६) कुत्रे भुंकतात.

• वरीलपैकी कुठल्याही वाक्यात क्रिया चालू दिसत नाही. किंवा एखाद्या वेळेसच ही क्रिया होते असेही दिसत नाही. या नेहमीच्या क्रिया आहेत. सूर्याचं पूर्वेस उगवणं रोजचंच आहे. खोटे बोलणे हरीची सवयच आहे. आणि अमेरिकेत राहणं रमेशचं नेहमीचंच आहे. यावरून साध्या वर्तमानकाळाचा उपयोग आपल्या लक्षात येतो. पहा:

एखादे नैसर्गिक सत्य, एखाद्याची वर्तमानकाळातील सवय किंवा नेहमी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमानकाळ वापरतात.

Simple Present Tense in English – साधा वर्तमानकाळ


● ‘साधा वर्तमानकाळ वापरतात’ म्हणजे काय?

लक्षपूर्वक वाचा :- ‘साधा वर्तमानकाळ वापरतात’ म्हणजे साध्या वर्तमानकाळाची जी ‘रचना’ पुढे येत आहे ती रचना वापरतात.

• मराठीचं वाक्य इंग्रजीत अचूक करता येण्यासाठी मराठीच्या वाक्याचा काळ अचूक ओळखता येणं आवश्यक आहे. पण फक्त वर्तमानकाळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ इतकंच ओळखणं पुरेसं नाही. कारण आपल्याला कळलं की वर्तमानकाळ चार आहेत, भूतकाळ चार आहेत आणि भविष्यकाळही चार आहेत. आणि या बारा काळांच्या १२ वेगवेगळ्या रचना आहेत. म्हणून वाक्याचा नेमका काळ कोणता ते ओळखावं लागेल.

• नेमका काळ समजल्यावर बरोबर रचना वापरून बरोबर वाक्य करता येईल. जसं, एखादं वाक्य वर्तमानकाळाचं आहे इतकंच आपल्याला कळलं तर रचना कोणती वापरणार वर्तमानकाळाच्या तर चार रचना आहेत. पण जर वाक्य चालू वर्तमानकाळाचं आहे असं समजलं तर नेमकी चालू वर्तमानकाळाची रचना वापरून वाक्य करता येईल.

• हे वाचत असताना कोणासमोर जर असा प्रश्न पडला की ‘काळ’ ओळखून, रचना पाहून मी मराठीचं वाक्य इंग्रजीमधे करून बोलेपर्यंत समोरचा माणूस थांबेल का? तर हा वाजवी प्रश्न आहे. याचं उत्तर पुढे तुम्हाला सविस्तर मिळेलच. सध्या फक्त इतकं लक्षात घेणं पुरेसं आहे की हे सुरुवातीचे दिवस आहेत. म्हणूनच काळ ओळखून रचनेप्रमाणे लक्षपूर्वक वाक्य करावंलागेल. पण जसं जसं या साध्या साध्या गोष्टीचा लक्षपूर्वक अभ्यास करत जाल आणि मधेमधे दिलेल्या साध्या सूचना पाळत तुम्ही पुढे जाल, तुम्हाला काळ ओळखावा लागणार नाही – रचना पहावी लागणार नाही .आणि मराठी वाक्य तुम्हाला इंग्रजीमधे आपोआप करता येईल – पटकन्.

• तर वर आपण मराठीच्या वाक्याचा काळ ओळखण्यासंबंधी बोलत होतो. काळ ओळखणं
सोपं आहे. वाक्य वाचल्याबरोबर वाक्यातील क्रिया पाहून तुम्ही वाक्याचा काळ ओळखू शकता. पण बऱ्याच वाक्यांचा काळ पूर्ण वाक्य न वाचताही ओळखता येईल. फक्त वाक्याच्या (=क्रियापदाच्या) शेवटी पाहून तुम्ही वाक्याचा काळ समजू शकता. जसं वरचीच काही साध्या वर्तमानकाळाची वाक्ये मी तुम्हाला परत लिहून दाखवतो. तुम्ही वाक्याच्या शेवटी लक्ष द्या :तो सकाळी लवकर उठतो / रात्री उशिरा झोपतो, सूर्य पूर्वेस उगवतो / पश्चिमेस
मावळतो. वाक्याच्या शेवटी ‘-तो’ हे अक्षर तुम्हाला दिसलं. मग यापुढे मराठीच्या वाक्यात शेवटी ‘तो’ हे अक्षर दिसल्यास तुम्ही त्या वाक्याचा काळ पटकन् ओळखू शकता – साधा वर्तमानकाळ.

• पण मराठीत प्रत्येक वेळेस साध्या वर्तमानकाळाच्या वाक्यात शेवटी ‘तो’ हेच अक्षर असणार नाही. कधी ‘तो’ च्या ऐवजी ‘ते’ किंवा ‘त’ ही अक्षरेही असतील, पहा:

● मराठीत वाक्याच्या (म्हणजे क्रियापदाच्या) शेवटी ‘-तो, ते, त, ता, तं, तोस,तेस’ यापैकी कोणतेही अक्षर असल्यास वाक्य साध्या वर्तमानकाळाचं असतं.

• लक्षात घ्या :-हे साध्या वर्तमानकाळाच्या मराठी वाक्याचं सर्वसाधारण लक्षण आहे.
‘-तो, ते, त’ ही अक्षरे नसलेलं वाक्यही साध्या वर्तमानकाळाचं असू शकतं. हे सगळं पुढे स्पष्ट
होईलच. तोपर्यंत काळाची वर दिलेली ओळख लक्षात ठेवणे पुरेसे आहे. आता इतकं पाहिल्यानंतर वाक्य साध्या वर्तमानकाळाचं आहे की नाही ते ओळखणं
तुमच्यासाठी कठीण नाही. आणि वाक्य साध्या वर्तमानकाळाचं आहे हे निश्चित झालं तर ते
वाक्य इंग्रजीमधे करताना पुढील रचना वापरायची :

कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप (s) +

या रचनेचा अर्थ :- वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होईल. (वाक्यात कोणता शब्दबीकर्ता आहे ते ओळखणं कठीण नाही. कर्ता म्हणजे करणारा – तर वाक्यातील क्रिया करणारा कर्ता होईल. ‘मी, तू, तो, ते, राम, शाम, हरी….’ असे शब्द म्हणजे कर्ते. मराठीच्या वाक्यात कर्ता बऱ्याचदा पहिलाच शब्द असतो.)
आणि कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येईल. गरज पडली तर या पहिल्या रूपाला s लागेल (s केव्हा लागतं ते आपल्याला पुढे पहायचं आहे). आणि वाक्यात आणखी जे काही शिल्लक राहील ते क्रियापदाच्या पुढे येईल.

● आता उदाहरणे पाहण्यापूर्वी आणखी एक शेवटचं – क्रियापदाच्या रूपाबद्दल.
क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप, तिसरे रूप आणि क्रियापदाचे ing रूप हे शब्द अधूनमधून तुमच्यासमोर येणार आहेत. इंग्रजीमधे काळानुसार आणि गरजेनुसार क्रियापदाचे योग्य रूप वापरावे लागते, जसे मराठीच्या वाक्यात ‘जाणे’ हे क्रियापद असेल तर ते वाक्य इंग्रजीमधे करताना नेहमी go हेच क्रियापद येईल असे नाही. कधी go येईल तर कधी went, कधी gone तर कधी going येईल.

● इंग्रजीच्या वाक्यात क्रियापदाच्या योग्य रूपाचा उपयोग झाला नाही तर वाक्याचा अर्थ बदलेल किंवा वाक्य चूक होईल. म्हणूनच आपण वरच्या रचनेत फक्त ‘क्रियापद’ इतकंच लिहिलं नाही, तर क्रियापदाचं पहिलं रूप असं लिहिलं.
या क्रियापदाच्या रूपांबद्दल सविस्तर माहिती काळ हे प्रकरण संपल्याबरोबर दिलेली
आहे.
‘साधा वर्तमानकाळ’ सुरू झाल्यापासून इथपर्यंत साध्या वर्तमानकाळाचा उपयोग,ओळख आणि रचना आपण लक्षात घेतली. आता इथून साध्या वर्तमानकाळाची काही वाक्ये इंग्रजीमधे करून दाखवली आहेत. त्यांचा अभ्यास करून त्या खालची वाक्ये तुम्ही स्वत: करायची आहेत.

परत एकदा थोडक्यात आठवण : साध्या वर्तमानकाळाचा उपयोग :- नेहमीची क्रिया व्यक्त करण्यासाठी.
मराठी वाक्याची ओळख :- वाक्याच्या शेवटी -तो, ते, त, ता, तोस, तं.
या काळाची रचना :- कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप (s) +
उदाहरणे :१) मी जातो = I go.
I= कर्ता go= क्रियापदाचे पहिले रूप
२) मी तिथे जातो = I go there.
३) मी तिथे दररोज जातो.
I go there every day.
४) मी दररोज दहा तास काम करतो. I work ten hours every day.
५) ते दिवसभर काम करतात.
They work all day.
६) ते दररोज इथे येतात.
They come here every day.

Simple Present Tense in English – साधा वर्तमानकाळ

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा