वाक्य रूपांतर – मराठी व्याकरण

Marathi Vakya, Vakya Rupantar, Vakyanche Prakar

मराठी वाक्य

● वाक्य व्याख्या : अर्थ स्पष्ट करणाऱ्या अनेक शब्दांचा समुच्चय म्हणजे वाक्य.

या ठिकाणी केवळ अनेक शब्दांचा समुच्चय अभिप्रेत नसून या शब्दसमुच्चयांपासून विशिष्ट अर्थबोध होणे महत्त्वाचे आहे.

वाक्यांचे प्रकार – वाक्य रूपांतर

मराठी व्याकरणातील वाक्याचे खालीलप्रमाणे प्रकार पाडले जातात

(१) विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी व उद्गारार्थी वाक्य
(२) होकारार्थी वाक्य व नकारार्थी वाक्य.
(३) स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विध्यर्थी वाक्य व संकेतार्थी वाक्य,
(४) केवल वाक्य, मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य.

विधानार्थी, प्रश्नार्थी व उद्गारार्थी वाक्ये

विधानार्थी वाक्य : अशा वाक्यात केवळ एखादे विधान केलेले असते.

उदाहरणार्थ

  • जग ही एक रंगभूमी आहे,
  • चुका करणे हा मानवाचा स्थायी भाव आहे,
  • तो खूप हुशा आहे,
  • हे जग दुःखाने भरलेले आहे.

प्रश्नार्थी वाक्य : अशा वाक्यात एखादा प्रश्न विचारलेला असतो. प्रश्नकर्त्यास प्रश्न करताना काही उत्तर अपेक्षित असते.

उदाहरणार्थ

  • तू उद्या काय करणार आहेस?;
  • आई गावाहून केव्हा परत येणार आहे? ;
  • तुला नोकरी लागली का?

पुष्कळदा प्रश्नकर्त्याच्या प्रश्नातच त्याच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले असते.

खाली अशी काही प्रश्नार्थक वाक्ये, त्यापुढे कंसात त्याचे अपेक्षित उत्तर व मूळची विधानार्थी वाक्ये उदाहरणादाखल दिली आहेत.

  • राष्ट्रापेक्षा तुम्ही धर्म महत्त्वाचा मानणार का? (… मुळीच नाही.)
  • राष्ट्रापुढे धर्म ही गौण बाब आहे.

उद्गारार्थी वाक्य : या वाक्यातून आनंद, आश्चर्य, दुःख अशी एखादी अथवा संमिश्र भावना प्रगट झालेली असते. लिहिताना अशा वाक्यातील भावना व्यक्त करणान्या शब्दानंतर व वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिले जाते.

उदाहरणार्थ
(१) अरेच्चा! तूही आलास तर!
(२) अरेरे! काय ही तुझी दशा!
(३) वा! किती अप्रतिम षट्कार!
(४) शाबास! तू तर अक्षरशः भूमिकाच जगलास!

होकारार्थी व नकारार्थी वाक्ये

होकारार्थी वाक्य: ‘करणरूपी वाक्य’ या दुसऱ्या नावाने संबोधल्या जाणाऱ्या या वाक्यातील क्रियापद होकारार्थी असते.
उदाहरणार्थ– तो सिनेमा पाहतो. ती सुंदर आहे.

नकारार्थी वाक्य: ‘अकरणरूपी वाक्य’ या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या या वाक्यातील क्रियापद नकारार्थी असते.

उदाहरणार्थ– तो तुझ्याबरोबर येणार नाही, ती परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही.

या ठिकाणी एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, एकाच अर्थाचे वाक्य होकारार्थी व नकारार्थी अशा दोन्ही स्वरूपांत मांडता येते.

उदाहरणार्थ – (१) हे काही सोपे काम नाही. (नकारार्थी). हे काम अवघड आहे. (होकारार्थी).
(२) तीही खूप सुंदर आहे. (होकारार्थी), ती काही कमी सुंदर नाही. (नकारार्थी).
(३) तो म्हणतो ते सगळंच काही खोटं नव्हे. (नकारार्थी), तो म्हणतो त्यात काही सत्यांशही आहे. (होकारार्थी).

या ठिकाणी एक लक्षात घेणे जरूर आहे की, तो उंच आहे; तो सुखी नाही; यांसारख्या वाक्यांचे रूपांतर करताना तो उंच नाही;

तो सुखी आहे अशा प्रकारे करू नये; कारण, अशा रूपांतराने वाक्याचा मूळ अर्थच उलटा होतो.

वरील दोन वाक्यांचे रूपांतर क्रमश:तो बुटका नाही; तो दुःखी आहे अशा प्रकारे करणे आवश्यक आहे; कारण त्यामुळे मूळ वाक्यातील अर्थ बदलत नाही.

स्वार्थी, आज्ञार्थी, विध्यर्थी व संकेतार्थी वाक्ये

स्वार्थी वाक्य
ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचाच बोध होतो किंवा वेगळ्या भाषेत बोलावयाचे तर फक्त स्वत:चा असा किंवामूळ अर्थच प्रगट होतो अशा वाक्यास ‘स्वार्थी वाक्य’ असे म्हणतात.

उदाहरणार्थ– मी चित्रपट पाहतो, तो उद्या येईल. मुले आजोळी गेली. त्याचा विवाह झाला.

आज्ञार्थी वाक्य :
ज्या वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा देणे, अनुज्ञा मागणे, विनंती अथवा प्रार्थना करणे, उपदेश करणे अथवा आशीर्वाद देणे अशाबाबींचा बोध होतो, त्या वाक्यास ‘आज्ञार्थी वाक्य’ असे म्हणतात. उदाहरणार्थ-तू दररोज अभ्यास कर. तू नियमित खेळत जा. तू व्यायाम कर. हे परमेश्वरा, त्यांचे रक्षण कर. मी येथे थांबू का? माझे ओझे थोडे हलके करशील का?

विध्यर्थी वाक्य :
ज्या वाक्यातील क्रियापदावरून शक्याशक्यता, योग्यता, कर्तव्य, इच्छा, आशा इत्यादी बाबींचा बोध होतो त्या वाक्यास ‘विध्यर्थी वाक्य’ असे म्हणतात. उदाहरणार्थ-दररोज अभ्यास करावा. हे गाणे ऐकावे ते लताच्या आवाजातच. तू उत्तमरीत्या उत्तीर्ण होवोस. देवा,मला भारताचा पंतप्रधान कर.

संकेतार्थी वाक्य :
ज्या वाक्यातील क्रियापदावरून काही अटींचा बोध होतो त्या वाक्यास ‘संकेतार्थो वक्य’असे म्हणतात. उदाहरणार्थ-‘तू जर मला साथ दिलीस तर मी हे काम करू शकेन, तू गेलास तरी चालेल, तो घरी असला तर मी त्याच्याकडेच थांबेन..

केवल, मिश्र व संयुक्त वाक्ये

केवल वाक्य
यास ‘शुद्ध वाक्य’ असेही म्हटले जाते. या प्रकारच्या प्रत्येक वाक्यात एक उद्देश्य व एकच विधेय असते किंवा वेगळ्या भाषेतसांगावयाचे तर या प्रकारच्या प्रत्येक वाक्यात एकच विधान असते.

उदाहरणार्थ -(१) तो परीक्षेत उत्तीर्ण झाला.
या वाक्यात एकच विधान केलेले आहे. ‘तो’ हे वाक्यातील ‘उद्देश्य’ व ‘झाला’ हे ‘विधेय’ होय.

मिश्र वाक्य
दोन किंवा अधिक केवल वाक्ये एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास ‘मिश्र वाक्य’ असे म्हटले जाते. त्यांतील एक वाक्य अर्थाच्यादृष्टीने स्वतंत्र असते. त्यास ‘प्रधान वाक्य’ किंवा ‘मुख्य वाक्य’ असे म्हणतात. या वाक्यातील इतर केवल वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात.

ती वाक्ये मुख्य वाक्यावर किंवा प्रधान वाक्यावर अवलंबून असतात व ती गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जसे- की, म्हणून, कारण, तर वगैरे मुख्य वाक्याशी जोडलेली असतात. थोडक्यात म्हणजे, “एक मुख्य वाक्य व त्यावर अवलंबून असणारी एक किंवा अधिक गौण वाक्ये जेव्हा गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने एकाच वाक्यात गुंफली जातात तेव्हा ‘मिश्र वाक्य’ तयार होते.”

उदाहरणार्थ

(१) जो वेगाने धावेल तोच सर्वांत आधी पोहोचेल.
या वाक्यात ‘तोच सर्वात आधी पोहोचेल’ हे मुख्य किंवा प्रधान वाक्य असून ‘जो वेगाने धावेल’ हे वरील मुख्य वाक्यावर अवलंबून असलेले गौणवाक्य आहे.

संयुक्त वाक्य :

संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक मुख्य वाक्ये असतात. जेव्हा अशी मुख्य वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी (उदाहरणार्थ- ‘व’, ‘किंवा’, ‘अथवा’ ‘आणि’, ‘पण’, ‘परंतु’, ‘सबब’, ‘म्हणून’) जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास ‘संयुक्त वाक्य’ असे म्हणतात.

उदाहरणार्थ

(१) तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला.या वाक्यात ‘तो कार्यालयात गेला’ आणि ‘कामाला लागला’ ही दोन मुख्य वाक्ये ‘आणि’ या प्रधानत्वदर्शक अव्ययाने जोडली
गेली आहेत.
(२) त्याने व्यापारात खूप पैसा मिळविला आणि टोलेजंग घर बांधले.
या ठिकाणी दोन मुख्य वाक्ये ‘आणि’ या प्रधानत्वदर्शक अव्ययाने एकत्र आली आहेत.
(३) त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही.
या ठिकाणी ‘त्याने अनेक ग्रंथ वाचले’ व ‘त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही’ ही दोन मुख्य वाक्ये, परंतु’ या प्रधानत्वदर्शक अव्ययाने एकत्र आली आहेत.

वाक्य |वाक्यांचे रूपांतर |वाक्यांचे प्रकार – Marathi Vyakaran

Similar Posts